विशेष मुलांना मिळाले बचतीचे धडे विहंग शाळेतील विद्यार्थ्यांना देवगिरी बँकेतर्फे बँक व्यवहारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या विहंग विशेष मुलांची शाळेत मुलांना बचतीचे धडे देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत दिव्यांग मुलांनी बँकेचे व्यवहार केले. यासाठी देवगिरी बँकेने सहकार्य दिले. विहंग शाळेत सध्या १६ वर्षांवरील मुलांसाठी व्यावसायिक गट सुरू आहे. ज्यात मुलांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्यात येतात. विहंग शाळेच्या आठ विद्यार्थ्यांचे देवगिरी बँकेत खाते उघडण्यात आले. शाळेने मुलांना प्रोत्साहन म्हणून दोन हजार आणि पालकांनी तीन हजार रुपयांची मदत केली. देवगिरी बँकेतर्फे शाखाधिकारी नेहा ओक व त्यांचे सहकारी सतीश त्रिभुवन, श्रद्धा काळे उपस्थित होते. माधुरी आफळे, मंजुषा कुलकर्णी व विशाल बेद्रे यांनी मार्गदर्शन केले. करुणा राजपूत यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.