Friday Focus by SPMESM (174)

प्रशिक्षित आरोग्य मित्रामुळे नवजात बालकाला मिळाले जीवदान
२४ आ‌क्टोबरच्या पहाटेची वेळ. एकलहरा गावातील एका महिलेला आपल्या शेताजवळ रस्त्यावर रक्ताचे डाग दिसले. एखादं जनावर आसपास असेल अशा शंकेनं इकडंतिकडं पहात असताना एका लहान बाळाचं अशक्त रडणं त्यांना ऐकू आलं. जवळ जाऊन पाहिलं तर एक नवजात अर्भक- अगदी नाळ देखील नीट कापलेली नाही, अशा अवस्थेतील- शेतात उघड्यावर कुणीतरी सोडून देऊन गेलं होतं. काय करावे या विचारात असताना त्या महिलेला एकदम आठवलं- कमलबाई जाधव याला वाचवू शकतील. त्यांनी त्यांना बोलावणं पाठवलं. 
कमलबाई, सावित्रीबाई फुले मंडळाच्या संजीवनी प्रकल्पाच्या प्रशिक्षित आरोग्यमित्र म्हणून परिसरात आरोग्य सुविधा पुरवतात. त्या धावतच आल्या. येतायेताच त्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना फोन केले. पटकन् निर्जंतुक ब्लेडने बाळाची योग्य पद्धतीने नाळ कापली, बाळाला स्वच्छ करून उबदार कपड्यात लपेटून थंडीपासून वाचवले. तेवढ्यात पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला रूग्णालयात नेले. कमलबाई नसत्या तर त्या दुर्दैवी अर्भकाचे प्राण वाचले नसते! डॅाक्टर व पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. बाळ आता शासकीय बालगृहात सुखरूप आहे. 
कमलबाईंसारख्या आरोग्य मित्र संजीवनी प्रकल्पाद्वारा ९८ गावांत महत्त्वपूर्ण प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवत आहेत. 
या प्रकल्पाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या विप्रो आणि यावर्षीपासून या प्रकल्पाला पुढे नेण्यात मदत करणाऱ्या कॅनपॅक या आमच्या सहयोगी कंपन्यांचे मनःपूर्वक आभार.

Share with :

Donate Now